About Us

अंबाजोगाई कळंब रस्त्यावर अंबाजोगाई पासून 12-13 किलोमीटर वर दिघोळ आंबा हे अंबाजोगाई तालुक्यातील (जि.बीड) एक छोटेसे गांव. या गावातील विद्याताई रूद्राक्ष यांची प्रत्यक्ष दिघोळ आंबा येथील त्यांच्या घरी भेट घऊन चर्चा केली (29/10/2021) आणि एका निऋतीच्या लेकीचा प्रवास उलगडत गेला. शेतीतील कष्ट , प्रयोगशीलता, नियोजन आणि कल्पकता वापरून यशस्वीपणे नैसर्गिक/सेंद्रीय शेती अतिशय निष्ठेने विद्याताई करीत आहेत. यात त्यांचे पती श्री बाबुरावजी रूद्राक्ष यांच्यासह उच्च शिक्षित मुलांची देखील साथ आहे. शेती व्यवसाय करतांना कौटुंबिक समन्वय आणि एकता अतिशय महत्वाची बाब असते. 2016 साली महिला विकास मंत्रालय भारत सरकार तर्फे आयोजित दिल्ली हाट येथील प्रदर्शनात विद्याताईंची माझी आधी भेट झाली होती. तेव्हा पासून आम्ही संवादी होतो. सुप्रसिद्ध पशुवैद्यक आणि तज्ञ डाॅ महादेव(भाऊ) पाचेगावकर ( पोहरा रेणापूर जि लातूर) हे विद्याताई चे वडील हे माझे जेष्ठ मित्र. गोवंशाचे ते गाढे अभ्यासक.

1986 साली Microbiology विषयात Bsc झालेल्या विद्याताई विवाहानंतर दिघोळ आंबा येथील रूद्राक्ष परीवारात आल्या. पती श्री बाबुरावजी रूद्राक्ष शेतकी खात्यात कृषी पर्यवेक्षक होते. दिघोळ आंबा येथील शेतीत विद्याताईंनी स्वताला झोकून दिले. कालांतराने श्री बाबुरावजी रूद्राक्ष साहेबांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन शेतीत विद्याताई सोबत पूर्णवेळ कार्यरत झाले. दोघही समजून उमजून शेतीप्रपंच व्यावहारिक पणे करीत आहेत. विद्याताई चा एक मुलगा कानपूर येथील IIT मधून एम.टेक. इंजिनियर झाला आहे. दुसरा पण इंजिनियर आहे. मुल पुण्यात नोकरी निमित्त आहेत पण तेही सातत्याने विद्याताई च्या कृषीप्रपंचात साथ देतात.

2014 पर्यंत विद्याताईंचे जग दिघोळ आंबा आणि शेती हेच होते. अतिशय निष्ठेने नैसर्गिक सेंद्रीय पद्धतीने शेती सुरू होती. त्यावर्षी प्रचंड गारपीट झाल्याने शेती चे नुकसान झाले तेव्हा मुंबई दूरदर्शनने विद्याताई ची मुलाखात घेतली गारपीटीची परीस्थिती आणि नुकसान त्यांनी अगदी प्रभावीपणे कथन केली त्यामुळे गावाला नुकसान भरपाई मिळाली. त्यानंतर विद्याताईंचा बाह्यजगतात परीचय वाढत गेला. दिघोळ आंबा येथील विद्याताई च्या 15 एकर शेतीत 200 केशर आंब्याची झाडं आहेत. हळद, अद्रक, तूर, जवस, करडई, दगडी ज्वारी, मूग सोयाबीन वगैरे पिक घेतात. सकाळी 10 वाजेपासून दिवसभर शेतातच नियोजनबद्ध राबत असतात. सोबतीला सहकारी महिला असतात. गटातील चार महिलांच्या सहकार्याने प्रक्रिया करून हळद, तूर दाळ ,ज्वारी विक्री सुरू आहे. केशर आंबा देखील योग्य वेळी विकला जातो. 2014 नंतर विद्याताई भारतातात अनेक ठीकाणी कृषीउद्योजक म्हणून विविध प्रदर्शनात सहभागी झाल्यात. भारतीय कृषी अनुसंधान परीषद ( ICAR) नवी दिल्ली चा जगजीवनराम महिला कृषीउद्योजकता पुरस्कार, महाराष्ट्र शासन कृषी विभागाचा जीजामाता पुरस्कार, Agro1 चा स्मार्ट शेतकरी पुरस्कार आणि अन्य अनेक पुरस्कारांनी विद्याताईंना सन्मानित केल्या गेले आहे.

शेतीला जीवनकार्य मानून विद्याताई कार्यरत आहेत. शेतीतील कामं नियोजन बद्ध करीत असतात. निसर्ग स्नेही तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर, मनुष्यबळ नियोजन, शेतीतील बदलाचा अभ्यास , शेतमाल प्रक्रिया आणि विक्री आपल्या शेतीतील प्रयोगांतील निरीक्षण व्यवस्थित मांडणी करणे, लोकांशी संवादी राहणे वगैरे सर्व कामे अतिशय सहजतेने करीत राहतात. सेंद्रीय शेती अभ्यास गटात सहभागी होत सातत्याने कृषी ज्ञान तंत्रज्ञान समजून घेत त्यांचा प्रवास सुरू आहे. शेतातील विविधप्रकारची कडबाकुट्टीचा सुयोग्य वापर करून गुरांना उत्तम आहार दिला जातो. महत्वाचे म्हणजे काडीकचरा रिसायकलींग विद्याताई कडील बायोगॅस संच गत 17 वर्षे वर्षांपासून उत्तम कार्यरत आहे. बायोगॅस चे हे यशस्वी उदाहरण आहे. कचरा आणि स्लरी च्या संयोगातून जवळपास 12-14 ट्राली उत्तम खत घराच्या आवारात तयार होते. बाहेरून काही आणावे लागत नाही. चहा, स्वयंपाक यावरच होतो. शिवाय या घर परीसरात कृषी औजार बॅंक आहे. शिवाय घरगुती बियाणांचा वापर शेतीत केला जातो. रूद्राक्ष परीवाराचे घर म्हणजे यशस्वी कृषीप्रपंचाचे उत्तम उदाहरण आहे. रूद्राक्ष ऑरगॅनिकला सामाजिक मान्यता मिळाली आहे. लोक शेतमाल घरून नेतात. अंबाजोगाई येथील मानवलोक संस्था, कृषी विज्ञान केंद्राचे देखील सहकार्य मिळत आहे.

शेतीत कायम चौकस आणि सजगपणे कार्यरत रहावे लागते. आस्मानी आणि सुलतानी परीस्थिती कायमच बदलत असते. त्यामुळे दरवर्षी नवनवीन आव्हाने असताना. परीस्थिती चे आकलन करून दररोज शेतीच्या बांधांवर आणि बाजारात तसे वागावे लागते असे परीस्थिती चे विश्लेषण विद्याताई करीत होत्या. आपला अनुभव हाच आपला गुरू असतो असे सोपे जगण्याचे तत्वज्ञान त्या मांडत होत्या. चेहर्यावर कुठेही काही विशेष करीत असल्याचा आव नव्हता. गावात बिनविरोध सरपंच होण्याची संधी आली होती तरीही त्या आपल्या कृषीप्रपंचातच रमल्या. राजकारणात गेल्यावर शेतीकडे वेळ कमी पडला असता. आणि शेती कडे दुर्लक्ष झाले असते.

आपल्या महिला बचत गटातील सहकारी सोबतीणींसोबत त्या निष्ठापूर्वक कार्यरत आहेत. मी भेटायला येणार म्हणून शेतातील कामाची व्यवस्था लावून त्या घरी आल्या. दिघोळ आंबा येथील त्यांच्या घरी वातावरण अतिशय शांत आणि उत्साहवर्धक आहे. गप्पा मारतांना घरातील कामे आणि पॅकिंग चे काम सुरूच होते. श्री रूद्राक्ष साहेबांच्या सोबत देखील छान गप्पा झाल्या. रूद्राक्ष परीवाराचा कृषीप्रपंच समजून घेणे हा माझ्यासाठी आनंदाचा अनुभव होता. कृषीमायेच्या या उत्सवपर्वात विद्याताई च्या भेटीने निऋतीच्या लेकीला भेटीचा आनंद झाला. थोडा शेतमाल शेतीतील आशा आणि आनंद मनात घेऊन रूद्राक्ष परीवाराचा निरोप घेतला.

Shopping Cart
Home
Shop
Account
Search